नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय खास निसर्गावर [Marathi Poems On Nature] काही सुंदर अश्या कवितांचे कलेक्शन जे की तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो. सध्या तरी इथे जरा कवितांची संख्या कमी आहे पण आम्ही या संख्यांमद्धे भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत. जर का तुम्हाला तुमची कविताआपल्या साइट वर दाखवायची असेल तर आम्हाला तुम्ही पाठऊ शकता आणि कवितांची संख्या 100+ नेण्यास मदत करू शकाल.

निसर्ग
येता तुझ्या कुशीत निसर्गा
बेहद्द जगावेसे वाटले
उमलत्या नाजूक कळ्यांना
पाहून हसावेसे वाटले
तलम ओली माया मातीची
पात्यांशी बोलावेसे वाटले
हिरवा वारा हिरवे पक्षी
जंगल व्हावेसे वाटले
© संदीप राऊत ~वाचू आनंदे
आनंदी पक्षी
केव्हा मारुनि उंच भरारी । नभात जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी। आनंदे भरली.
आनंदाचे फिरती वारे। आनंदाने चित्त ओसरे,
आनंदे खेळतो कसा रे। आनंदी पक्षी !
हिरवे हिरवे रान विलसते । वृक्षलतांची दाटी जेथे,
प्रीती शांती जिथे खेळते । हा वसतो तेथे
सुंदर पुष्पे जिथे विकसली। सरोवरी मधु कमले फुलली
करीत तेथे सुंदर केली । बागडतो छंदे.
हासवितो लतिकाकुंजांना । प्रेमे काढी सुंदर ताना;
आनंदाच्या गाउन गाना । आनंदे रमतो
जीवित सारे आनंदाचे । प्रेमरसाने भरले त्याचे;
म्हणोनिया तो रानी नाचे । प्रेमाच्या छंदे
आम्हाकरिता दुर्धर चिंता । नाना दु:खे हाल सभोता,
पुरे! नको ही नरतनु आता । दुःखाची राशी !
बा, आनंदी पक्ष्या, देई। प्रसाद अपुला मजला काही,
जेणे मन हे रंगुनि जाई। प्रेमाच्या डोही,
उंच भराऱ्या मारित जाणे । रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाइल चित्त जयाने । दे, दे ते गाणे !
निसर्गासारखा नाही रे सोयरा..
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
नभ उतरू आलं..
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा
– ना. धो. महानोर
निसर्ग
माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल,
माझा अनुभव कधी घेतलाच नसेल,
माझ्या कुशीत कधी येऊन पहा,
कधी मलाही तुम्ही जवळून पहा
प्रगती
दिवसागणिक प्रगती,
समृद्धि करतोय माणुस…
निसर्गाचा ऱ्हास करून
शहरे वाढवतोय माणुस…
स्वतः केलेल्या प्रगतीवर,
स्वतःच आपली थोपटून
पाठ घेतोय माणुस…
आपल्याच मरणाची
तयारी करून
ठेवु लागलाय माणुस…
निसर्ग न्यारा
पानांची ती झुळूक,
पाण्याच्या त्या सरी.
मंद मंद वाहे,
हवेच्या त्या लहरी.
गजबज झुडुपात करे,
किलबिल तो पक्षांचा थवा.
फुलपाखरू जणू बसुनी,
फुलांवरी घेई जन्म नवा.
काळोख मेघ बघुनी,
नाचे थुई थुई तो मोर.
होऊनी आनंदी हरणीपण,
गिरक्या घेती जोर.
निसर्ग आणि प्रदूषण
शेती म्हातारी झाली
कारखाने जन्मले
हवेत वायू सोडून
कित्येक भोपळी मेले
सायकल गेल्या
मोटारी चालू लागल्या
धुरांडया त्यांच्या
नाकाला लोंबु लागल्या
पाण्याचा माठ
मातीतच गेला
शीतगृहातला वायु
ओझोन चिरत गेला
छतावरचा पंखा आता
निपचित पडून असतो
ए . सी . मात्र दिवसरात्र
गालात हसत असतो
खाण्याच्या तोंडाची
फुकणी बनली
मरण्याच्या निमित्ताला
एक दांडी पुरली
हे विभिन्न वायू सारे
आजूबाजूलाच वसतात
शरीरात घुसून हळूच
आयुष्याचे गणित चुकवतात
निसर्गास घातक प्रदुषण
कैसे संकट
हवा प्रदूषणाचे…
हे टाळायचे…
हे प्रदूषण
संकटाचे द्योतक…
परी घातक…
हा प्राणवायू
असे मिळे अशुद्ध…
संकट खुद्द…
महत्त्व आहे
राहण्याला जिवंत…
प्रदूषणात…
आहे अशक्य
म्हणून वेळे जागा…
जपे हा धागा…
पर्यावरण
जगण्याचा आधार…
ते निराधार…
ही वसुंधरा
रडे नित्य नेमाने…
प्रदुषणाने…
झाडे लावा
प्रदूषणच टाळा…
बसवू आळा…
1 thought on “Best Marathi Poems On Nature 2022”